Sunday, 13 November 2016

MY FAVORITE SEASONS ESSAY IN MARATHI

                   MY FAVORITE SEASONS ESSAY IN MARATHI                              
                माझा आवडता ऋतू  
                                   
                             दिवसांमागुनी दिवस संपले,
                               ऋतूंमागुनी ऋतू,
                            जिवलगा, कधी रे येशील तू?

      गाणं नेहमीचंच. तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या ओळखीचं. पण आज मात्र ते गुणगुणताना कुणासाठी तरी
आसुसण्यापेक्षा, जिवलगाची वाट बघण्यापेक्षा, येणाऱ्या नवीन ऋतूलाच 'कधी रे येशील तू' असं विचारावसं
वाटतंय. ऋतूचक्रातून अनंत आवर्तनं गाणाऱ्या निसर्गराजाचा नवीन रंग बघण्याची हुरहूर लागून राहिलीये.
होलिकोत्सवाच्या समाप्तीनंतर लागलेत वसंताचे वेध. करड्या, सुकलेल्या वृक्षवेलींच्या अंगाखांद्यावर डवरलेली
पांढरी-पिवळी फुलं, बोचऱ्या थंडीचा त्रास कमी करणारी सोनेरी ऊब, आपल्या जोडीदारास साद घालणारा
कोकीळ, या सगळ्यांसाठी जीव वेडावलाय. पण सगळी दुनिया वसंताच्या स्वागतासाठी सज्ज झाली असताना मी
मात्र माझा आवडता ऋतू कोणता, या एकाच प्रश्नाचं उत्तर देण्याच्या प्रयत्नांत.

    आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा किती फसवं आहे पहा. वसंताचं नाव घ्यावं, तर मनात पावसाच्या सरी थैमान
घालणार. त्या झेलून चिंब भिजायचं ठरवलं, तर घोंघावणारा वारा नि बोचरी थंडी, अंगणतली शेकोटी,
तिच्याभोवती फेर धरून गायलेली गाणी हिवाळ्याचं नाव पुढे करणार. बरं, पर्याय तर मर्यादित आहेत, आणि
फ़िफ़्टी-फ़िफ़्टी, ऑडिअन्स पोल किंवा फ़ोन-अ-फ़्रेंडची जीवनरेखासुद्धा कामाची नाही. या कोड्याचं उत्तर दिलं
तर बक्षीस म्हणून एक करोड रुपयेसुद्धा कमी पडावेत अशी अवस्था. पण त्याच वेळी, उत्तर शोधल्याशिवाय
स्वस्थ न बसण्याची खुमखुमीसुद्धा. त्यातच हे निबंधलेखनाचं निमित्त.

   माझा आवडता ऋतू शोधण्याच्या प्रयत्नांत आजतागायतच्या बावीस वर्षांच्या या आयुष्यरुपी चित्रपटाची रिळं
रिवाइंड करून पहावीत, तर दिसतो 'बालपणीचा काळ सुखाचा'. कोणीही येऊन गोबरे गालगुच्चे घेऊन
जावं, नि आपण मात्र टकाटका बघत बसावं; मध्येच गोड हसून सगळ्यांची शाबासकी मिळवावी, आणि कुणी
लाडानं कडेवर घेतलंच, तर बिनदिक्कत आपल्या प्रेमानं त्याला किंवा तिला भिजवून वर साळसूदपणे गळा
काढावा. आयुष्यातला वसंतच तो जणू. आईनं घेतलेला अभ्यास, बाबांकडून झाडूनं खाल्लेला मार, शाळेतल्या
बाईंचे चुका केल्यावर दटावणारे डोळे, पण त्याचबरोबर परीक्षेत पहिला नंबर आल्यावर याच सगळ्यांनी मला
डोक्यावर घेऊन नाचणं. शाळेपासून आजपर्यंत नेहमीच बरोबर राहिलेले मित्रमैत्रिणी, आलेले अनुभव आणि
झालेले संस्कार यांनी रुजवलेलं आजचं तरुणपण. बालपणीचे ते नानाविध रंग, त्या सोनेरी दिवसांची अजूनही
जाणवणारी ऊब आणि त्या वसंतानं दिलेली आजच्या ग्रीष्माची नि पुढच्या पावसाळ्याची नि हिवाळ्याची वर्दी.

    आज हाच वसंत मला पावसासारखं भिजवून टाकतोय. आठवणींच्या सरींमध्ये चिंब झाल्यानंतर दरवळणाऱ्या
तारुण्याच्या सुगंधाचा गोडवा आज जास्त मोहक वाटतोय. आयुष्याच्या या टप्प्यावर सगळेच ऋतू आपापला ठसा
उमटवू पाहताहेत. आजपर्यंत मिळवलेलं यश, उद्याबद्दलच्या अपेक्षा नि स्वप्नं या सगळ्यांबरोबरच जाणीव
होतेय ती नवीन जबाबदाऱ्यांची आणि पार पाडाव्या लागणाऱ्या नवीन भूमिकांची. जे मिळवलं ते टिकवायचं आणि
ते टिकवतानाच नवीन काहीतरी मिळवायचं असे दुहेरी चटके देणारा ग्रीष्मसुद्धा आजच अनुभवायला मिळतोय.
आणि तो सुद्धा आठवणींच्या पागोळ्यांवरून टपटपणाऱ्या बालपणीच्या रंगीबेरंगी वसंताचा पाऊस अंगावर झेलताना.
म्हणजे या तारुण्याला पुढच्या आयुष्याची वर्दी देणारा नि गत आयुष्याचे रंग नव्याने उलगडून दाखवणारा वसंत
समजावं, जबाबदारी नि स्पर्धेच्या रणरणत्या उन्हात घाम गाळायला लावणारा ग्रीष्म समजावं, की आषाढसरींनी
जन्माला घातलेल्या, मनात खळखळणाऱ्या विचारांच्या धबधब्यांनी कानात दडे बसवणारा पाऊस समजावं, हे
कळेनासं होऊन गेलंय.

    तारुण्याच्या या पावसाळ्यातच लपलाय गृहस्थाश्रमाचा हिवाळा. काही वर्षं अनुभवलेली कुणाच्यातरी प्रेमाची ऊब,
आणि ती हरवल्यावर चोरपावलांनी आलेली मनातली पानगळ. चार-सहा वर्षांत आजचा पावसाळा संपलेला
कळणारही नाही; आणि नोकरीधंदा, संसार, रोजचं नऊ ते पाच, मुलंबाळं हे सगळं झोंबायला लागेल. आजवर
जे काही शिकायला नि अनुभवायला मिळालं, त्याचेच स्वेटर्स, मफ़लर्स विणून तेव्हा वापरायचेत. हीच त्यावेळची
शेकोटी असणार आहे हे आज कळतंय. अनंतात कुठेतरी लपलेल्या होळीत स्वतःला झोकून दिलं नि पानगळीतल्या
तपकिरी-पिवळ्या पानासारखं हळुवार तरंगत गळून पडलं की मगच आयुष्याचं हे ऋतूचक्र पूर्ण होईल याची
जाणीव करून देणारा हिवाळासुद्धा ऐन उमेदीच्या काळात जाणवतोय खरा. आणि म्हणूनच कालच्या बालपणीचा
वसंत नि उद्याच्या उरलेल्या आयुष्याचा हिवाळा यांत सँडविच झालेलं सगळे ऋतू सामावलेलं माझं आजचं तारुण्य
हा माझा आवडता ऋतू. विचारांची बैठक, तर्कसंगती, निबंधाची शब्दसंख्या नि मांडणी इत्यादी मोजपट्ट्या हा
ऋतू अनुभवायला, त्यातला आनंद लुटायला (की मोजायला?) कामाच्या नाहीत. हा आनंद पोटभर पिऊन घेणं,
डोळे भरून साठवून घेणं हेच या ऋतूचं बिनव्याजी कर्ज - परतफेडीची यत्किंचितही अपेक्षा न ठेवलेलं.
मनातल्या प्रत्येक कोपऱ्याची, जीवनातल्या प्रत्येक सेकंदाची या ऋतूत केलेली गुंतवणूक मात्र महत्त्वाची आहे.

     माझा आवडता ऋतू कोणता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता गरज उरलेली नाही. या निबंधातूनच मला
माझं उत्तर मिळालंय. किंबहुना माझ्या सदाबहार, तरुण मनानं ते आपल्याआपणच हुडकून काढलंय. कदाचित
आयुष्यभर 'अजून यौवनात मी' गाण्यासाठीच. What about you?


"for supporting me please click on ads"



2 comments:

  1. dimeapp.in is one of the fastest Live cricket score app performing in the arena of Cricket match scores and You can choose any upcoming match of your choice to watch it over and get full insights over Match history.
    dimeapp.in is an Ads free cricket app which makes your cricket viewing experience even more exciting plus Accurate match odds with session updates, Search matches date-wise, team-wise, and series-wise too.
    dimeapp.in is 100% free to download and use an app for viewing All T20, ODI, Domestic and International women/men Test Matches and even IPLs and PSL. You can even watch the World Cup, Asia Cup and upcoming schedules of upcoming matches in this App.
    dimeapp.in is the No.1 rating app on our list. This app is a lifeline for cricket lovers. Not only, it is interactive & convenient-to-use software, but it furthermore wraps all aspects of cricket.
    It will give to the detailed stats, rankings & records, Precise odd-even sessions. Even it also helps to skillfully navigate team/date/year wise matches. It also provides daily articles & alerts on feverish cricket headlines.
    As per reviews and information on the Internet, we will recommend dimeapp.in for a cricket lover to satisfy their craving to know the scores fastest of fast that too with free-subscription & Ads-free...

    ReplyDelete
  2. Marathi Nibandh Marathi Essay: (Marathi Nibandh) - Marathi Essay: Marathi is our mother tongue. Learning and improving your Marathi language skills is very important for working in most places in Maharashtra.

    ReplyDelete