CATASTROPHIC RAIN ESSAY IN MARATHI प्रलयकारी पाऊस
पाऊस हा माणसाचा मित्र, त्याचा पोशिंदा, सर्व सृष्टीचाच तो जीवनदाता! पण याच जीवनदात्या पावसाने त्या दिवशी अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि मुंबईसह महाराष्ट्रात
अक्षरश: हाहाकार माजवला.
तो दिवस होता २६ जुलै २००५. आदल्या रात्रीपासूनच पावसाने संततधार लावलीहोती.सकाळीसुद॒धा तो कोसळतच होता. मुंबईकरांना आपल्या कामाच्या घाईमुळे इकडेतिकडे बघायला फुरसत नव्हती. दिवस पुढे सरकत होता. मुंबईची गती वाढत होती आणि पावसाचा जोरही वाढतच होता. अगदी थोड्याच काळात तो ‘ न भूतो न भविष्यति' असा कोसळला आणि मग जाणवू लागले की, हे काहीतरी विपरीतच घडत आहे.
त्यातच ती भरतीची वेळ होती. सगळीकडे पाणी वाढू लागले. रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे धावणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या. रस्ते जलमय झाल्याने मोटारीदुचाकी वाहने, बसेस जागच्या जागी थांबल्या आणि थोड्याच वेळात मुंबईची दळणवळण यंत्रणा बंद पडली. भरीत भर म्हणजे अनेक ठिकाणी टेलिफोन, मोबाइल यंत्रणादेखील बंद पडली
सकाळी घराबाहेर पडलेली माणसे घरी परतू शकत नव्हती. रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड
लोंढे वाहत होते, त्यांत कित्येक गोष्टी, माणसे, जनावरे वाहून जात होती. असा प्रलय यापूर्वी कधीच झाला नव्हता. वरून पाऊस कोसळत होता. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद पडला होता माणूस अगतिक होऊन जागच्या जागी थांबला.
अशा
या प्रलयात एका असामान्य गोष्टीचा साक्षात्कार झाला. माणसांतील माणुसकी जागी झाली. पावसात
सापडलेल्यांना, घरी जाऊ न शकलेल्यांना इतर लोक मदत करू लागले. कुणी पाणी दिले, कुणी
चहा, कुणी जेवण, कुणी आसरा...
कोसळणाऱ्या
पावसामुळे कुठे डोंगराचे कडे कोसळले. गरिबांच्या झोपड्या माणसांसह त्याखाली गाडल्या
गेल्या. वर्षानुवर्षे लोकांनी जोडलेले किडूकमिडूक पाण्यात वाहून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी
पावसाचा जोर कमी झाला. ठप्प झालेले जनजीवन मंद गतीने हलू लागले आणि नुकसानीचा
अंदाज घेऊ लागले. आता भीती होती रोगराईची. साऱ्या महाराष्ट्रात या कोसळणाऱ्या
पावसाने हाहाकार माजवला होता. गावेच्या गावे वाहून गेली होती.एरवी हवाहवासा वाटणारा पाऊस त्या दिवशी नकोनकोसा
झाला होता!
"for supporting me please click on ads"